सध्याच्या काळात माणसाच्या जगण्याबद्दल भयंकर प्रश्न ऊपस्थित होत आहेत. या काळात माणसाने आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहील्यास माणुस सुखाने जगु शकतो असे प्रतिपादन कवि केशव खटींग यांनी केले. रविवार दि. २८ नोव्हेंबर रोजी गणेश वाचनालयाच्या वतीने एक पुस्तक एक दिवस या उपक्रमात “सहजचं सुचलं” या विनोद डावरे लिखित ललित लेख संग्रहावर चर्चा पार पडली. यावेळी व्यासपीठावर प्रा. रवि झिंगरे, पुस्तकाचे लेखक विनोद डावरे ऊपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना खटींग म्हणाले, फेसबुक एक स्वतंत्र व्यासपीठ असून या ठिकाणी लिहीण्यास स्वातंत्र्य आहे. मुक्तपणे अभिव्यक्त होण्यासाठीचे ते मोठ साधन आहे. कोरोना काळात याची समाजाला खूप मदत झाली. “सहज सुचलं" हा विनोदी लेख संग्रह आहे व सध्याच्या काळात विनोदी लेखनाची वाचकाला गरज आहे. एक काळ असा होता की टवाळा आवडे विनोद असं म्हणत होते, त्यामुळे विनोदाला लहान समजण्याची पद्धत होती. परंतु आजचा काळ तणावाचा काळ आहे, ज्याला विनोद कळतो व ज्याला विनोदात रस आहे जो विनोदाकडे सकारात्मकतेने बघतो त्याला सुखाने जगता येते. विनोदा शिवाय जगणे अवघड झाले आहे. कोरोना नंतरचा काळ असा आहे की अनेकांच्या जवळची माणसे सोडुन गेली आहेत. त्यामुळे जगण्याबद्दल इतके भयंकर प्रश्न उपस्थित झाले असताना आपण जर विनोदी पद्धतीने आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहिलं तर सुखाने जगू शकतो. प्रा. रवीशंकर झिंगरे पुस्तका विषयीच्या भावना व्यक्त करताना म्हणाले, पुस्तक छापणे आता दुर्मिळ होत चालले आहे. या पुस्तकातील हे लिखाण जरी फेसबुकच्या वॉलवर असले तरी आपल्या भावना छापील स्वरूपात समाजा समोर आणणे ही चिरंतन गोष्ट आहे. फेसबुकवरील लिखाणामुळे स्फुट लेखन वाढले आहे. पण लेखकाने दीर्घ लिखाण करुन लेखांचा विस्तार वाढवावा. हे लिखाण फेसबुकसाठी लिहिलेले आहे, असं जरी लेखक सांगत असले तरी यामध्ये एक गंभीर धागा आहे. हा धागा निश्चितच महत्त्वाचा असुन गंभीर आहे, काहीतरी मेसेज देणारा आहे. आपण आपल्या क्षमता कधी ताणुन पहात नाही. एक सुचलेला विचार हा ताणावा, पसरवावा लागतो. एका थेंबाच्या स्वरूपात जरी प्रत्येक स्फुट दिसत असले तरी त्यामध्ये पसरण्याची क्षमता आहे. प्रत्येक स्फुट एक गंभीर मेसेज देतो. असेही प्रा. झिंगरे म्हणाले. यावेळी लिखाणामागची भुमिका स्पष्ट करताना विनोद डावरे म्हणाले, फेसबुक सारखा मोठा कॅनव्हास मिळाल्यामुळे लिखाणाला सुरवात झाली, फेसबुक मुळे बरच काही मिळालं. मित्र, प्रसिद्धी, मिळाली. या लिखाणाने मला आत्मिक समाधान दिले आहे. कार्यक्रमाच्या सुरवातीला सुप्रसिद्ध साहित्यिक बाबा कोटंबे यांच्या ‘कदाचित’ या कादंबरीला पुणे मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.